Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भपात होऊ शकतो का?

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भपात होऊ शकतो का?

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भपात होऊ शकतो का?

जर तुम्हाला पहिल्यांदाच बाळ होणार असेल तर तुमच्यासाठी तो एक जबरदस्त अनुभव असू शकतो ह्यामध्ये काही शंका नाही. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कृतीविषयी तुम्हाला प्रश्न पडतील. तुम्ही तुमच्या प्रत्येक कृतीबाबत सावध रहा. कधीकधी, गरोदरपणात तुम्ही तुमच्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेऊ शकता किंवा नाही असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भपात होऊ शकतो असे अनेक गर्भवती महिलांना वाटते. गर्भधारणा झाल्यानंतर २० आठवड्यांच्या आत जेव्हा गर्भधारणा संपुष्टात येते तेव्हा गर्भपात झालेला असतो. एकूण गर्भधारणेच्या सुमारे १५ ते २०% प्रकरणांमध्ये गर्भपात होतो. गर्भधारणा होऊन गर्भपात झाला आहे हे सुद्धा बहुतेक स्त्रियांना समजत नाही. गर्भपात होण्यामागे गरोदरपणातील लैंगिक संबंध हे कारण नक्कीच नाही.

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भपात होऊ शकतो का?

सांख्यिकीयदृष्ट्या, बहुतेक गर्भपात गरोदरपणाच्या पहिल्या १३ आठवड्यांत होतात. एखाद्या गर्भवती स्त्रीने ह्याच काळात तिच्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेवले तर तिच्या मनात गर्भपात होण्याची शंका असते. पण ते खरे नाही. संभोगानंतर गर्भपात होण्याची शक्यता फारच कमी असते. गर्भपात सहसा गुणसूत्रांच्या विकृतीमुळे होतो.

गरोदरपणात गुंतागुंत नसलेल्या महिलांनी, त्यांच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे. खरं तर, डॉक्टर म्हणतात की गरोदरपणाचा संपूर्ण कालावधी हा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी सुरक्षित आहे. जर तुमची गर्भधारणा निरोगी असेल तर तुम्ही तुमच्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेऊ शकता. परंतु लैंगिक संबंध ठेवताना तुम्ही सुरक्षित आणि आरामदायी स्थिती निवडली पाहिजे. तुम्ही तुमच्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेवत असताना, तुमच्या गर्भाशयातील गर्भजल तुमच्या बाळाचे संरक्षण करेल. त्यामुळे काळजी करू नका तुमच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने तुमच्या बाळाला त्रास होणार नाही. परंतु जर तुम्हाला प्लेसेंटा प्रिव्हिया सारख्या काही समस्या असतील तर तुम्ही लैंगिक संबंध टाळावेत.

गर्भपात कसा टाळाल?

गर्भातील क्रोमोसोमल विकृतींमुळे बहुतेक गर्भपात होत असतात. जीवनशैलीतील काही बदल गर्भवती महिलेला गर्भपात टाळण्यास मदत करू शकतात. गरोदरपणात गरोदर स्त्रीने धूम्रपान करणे, मद्यपान करणे आणि औषधे घेणे टाळले पाहिजे. कॅफीन मर्यादित प्रमाणात घेणे हा देखील एक चांगला पर्याय आहे, कारण कॅफीन गर्भवती महिला आणि तिच्या वाढत्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

गरोदरपणात सेक्स करणे खूप छान असू शकते. तुम्ही तुमच्या पतीसोबत प्रणयाचा आनंद घेतल्यास तुमचा मूड हलका होऊ शकतो, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेवता तेव्हा तुमच्या शरीरात आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात आणि त्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटते. त्यामुळे तुम्हाला फिरावेसे वाटते तसेच व्यायाम करावासा वाटतो. गरोदरपणात अजिबात शारीरिक संबंध न ठेवणे हा योग्य पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. लैंगिक संबंध ठेवल्यामुळे तुमचे गर्भारपण कोणत्याही प्रकारे धोक्यात येणार नाही.

गरोदरपणात संभोग कुणी टाळावा?

डॉक्टरांचे म्हणणे आहे की ज्या स्त्रियांना खाली नमूद केलेल्या काही विशिष्ट वैद्यकीय समस्या आहेत,त्यांनी गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवणे टाळले पाहिजे.

  • प्लेसेंटा प्रेव्हिया: प्लेसेंटा प्रेव्हिया ह्या समस्येमध्ये नाळ खाली सरकलेली असते. आणि त्यामुळे गर्भाशयाचे मुख अंशतः किंवा पूर्णपणे झाकलेले असते. अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे याचे निदान केले जाऊ शकते. गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीत वेदनारहित रक्तस्त्राव होणे हे नाळ खाली सरकल्या चे सर्वात सामान्य लक्षण आहे. काही वेळेला बाळ आडव्या स्थितीत असल्यामुळे असे होते. ही स्थिती बाळाच्या वाढीस अडथळा आणू शकते. ह्या स्थितीत असलेल्या स्त्रियांना सहसा बेड रेस्टची शिफारस केली जाते. असे घडण्याची शक्यता २०० पैकी एकदा होते.
  • गर्भाशयाचे मुख लहान असणे: ह्या स्थितीत, स्त्रीच्या गर्भाशयाचे मुख लहान असते आणि गरोदरपणात ते लवकर उघडते. अशा वेळी गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूती होण्याची शक्यता जास्त असते. ही समस्या असलेल्या स्त्रियांना लैंगिक क्रियाकलापांसह कठोर क्रियाकलाप टाळण्याचा सल्ला दिला जातो. अशी शक्यता १०० पैकी एका प्रकरणात आढळते.

तुम्ही केंव्हा काळजी केली पाहिजे?

जर तुम्हाला प्लेसेंटा प्रेव्हिया सारखी समस्या असेल तर तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्याआधी डॉक्टरांशी बोलले पाहिजे ह्यात शंका नाही. तसेच, जर तुम्हाला वेदनादायक पेटके येत आतील किंवा जास्त रक्तस्त्राव होत असेल किंवा तुमच्या संभोगानंतर गर्भजल बाहेर पडू लागले तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे का?

जोपर्यंत तुमची गर्भधारणा निरोगी आहे तोपर्यंत गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत तसेच संपूर्ण गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवणे पूर्णपणे सुरक्षित आहे. गर्भपात मुख्यतः पहिल्या तिमाहीत किंवा गरोदरपणाच्या पहिल्या १३ आठवड्यात होतो. त्यामुळे तुमची दुसरी तिमाही सुरु झाल्यावर गर्भपात होण्याची शक्यता कमी होईल, तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

. गरदोरपणात संभोगासाठी सर्वोत्तम स्थिती (सेक्स पोझिशन) कोणत्या आहेत?

तुम्हाला आरामदायक वाटत असेपर्यंत बहुतेक सर्व पोझिशन्स ठीक असतात. जोपर्यंत तुम्हाला अस्वस्थ वाटत नाही तोपर्यंत ओरल सेक्स देखील सुरक्षित आहे. तुमच्या पतीशी शारीरिक संबंध ठेवा. नवनवीन मार्गानी एकमेकांमध्ये बंध निर्माण करा आणि नवीन पोझिशन्स शोधा तुम्ही आनंदी व्हाल!

सेक्स ही एक आरोग्यदायी क्रिया आहे. गरोदरपणात प्रणयाचा आनंद घेतल्यावर तुम्ही तणावमुक्त आणि आनंदी राहू शकता. तुम्हाला कोणत्याही वैद्यकीय समस्या नसतील तर लैंगिक संबंधामुळे कोणत्याही प्रकारे गर्भपात होणार नाही. तुम्हाला काही शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या . तुम्हाला निरोगी गरोदरपणासाठी शुभेच्छा!

आणखी वाचा:

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कसे झोपावे?
गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये घ्यायची महत्वाची काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article