आहार आणि पोषण

गर्भारपणाचा पहिला महिना: आवर्जून खावेत आणि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ

गर्भारपणात बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योग्य पोषक आहार अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. गर्भारपणाच्या तीन महिने आधीपासून गरोदर महिलांनी जन्मपूर्व जीवनसत्वे घेतली पाहिजेत. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यातील आहार हा विकसनशील गर्भाच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करावेत आणि कोणते टाळले जावेत याविषयी हा लेख आपल्याला मार्गदर्शन करेल.

गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात खाल्ले पाहिजेत असे पदार्थ

आपली गर्भधारणा चाचणी जेव्हा सकारात्मक असते, तेव्हा आपण आधीच सुमारे अडीच आठवड्यांच्या गर्भवती असता, म्हणून जर आपण गर्भधारणा करू इच्छित असाल तर आपण निरोगी खाणे सुरू केले पाहिजे आणि जंक फूड, तंबाखू, मद्य आणि औषधे टाळली पाहिजेत. गर्भधारणा आहाराच्या तक्त्यामध्ये पहिल्या महिन्यासाठी भरपूर फळे आणि भाज्या असाव्यात. स्वस्थ गर्भधारणेसाठी पहिल्या तिमाहीच्या आहारात खालील खाद्यपदार्थ असायला हवेत.

१. दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थ नेहमीच कॅल्शिअम, जीवनसत्व डी, प्रथिने, निरोगी चरबी आणि फॉलीक ऍसिड यांचा एक चांगला स्त्रोत असतात. गर्भधारणेच्या पहिल्या तीन आठवड्यात, आपल्या आहारात दही, दूध आणि चीझ यांचा समावेश करा.

२. फोलेट समृद्ध अन्नपदार्थ

बाळाच्या न्यूरल ट्यूबच्या योग्य विकासासाठी फोलिक अॅसिड आवश्यक आहे. न्यूरल ट्यूब, नंतर मेंदू आणि मणक्यामध्ये विकसित होते. आपण फॉलिक ऍसिड पूरक औषधे घेत असलात तरी देखील आपल्या आहारात फॉलेट-समृध्द अन्न समाविष्ट करणे आवश्यक आहे. फोलेट समृध्द खाद्य पदार्थ म्हणजे गडद हिरव्या पालेभाज्या, शतावरी, लिंबूवर्गीय फळं, बीन्स, मटार, दालचिनी, एवोकॅडो इत्यादी.

3. संपूर्ण धान्य

संपूर्ण धान्य हे कर्बोदके, तंतू, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, लोह, मॅग्नेशियम आणि सेलेनियम सारख्या खनिजे यांचे स्वस्थ स्रोत आहेत. आपल्या बाळाच्या निरोगी वाढीसाठी आणि विकासासाठी हे आवश्यक आहे. ज्वारी, तपकिरी तांदूळ, संपूर्ण-गहू ब्रेड, पास्ता, बाजरी आणि ओटमील ही सर्व धान्य पदार्थांची उदाहरणे आहेत.

४. अंडी

अंडी हे प्रथिने, जीवनसत्त्वे अ, ब २, ब ५, ब ६, ब १२, ड, ई आणि फॉस्फोरस, सेलेनियम, कॅल्शियम आणि जस्त ह्या सारखी खनिजे यांचे चांगला स्त्रोत आहेत. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात अंडी आणि कुक्कुट मांस खाणे हे गर्भाच्या निरोगी विकासाची खात्री देते.

५. फळे

खरबूज, एव्होकॅडो, डाळिंब, केळी, पेरू, संत्री, स्ट्रॉबेरी आणि सफरचंद यासारख्या फळांमध्ये बाळांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात.

६. भाज्या

भरपूर रंगीबेरंगी भाज्या खाल्ल्याने आपल्या वाढणाऱ्या बाळासाठी पोषक तत्त्वांची विस्तृत श्रेणी मिळते.उदा: ब्रोकोली, पालक, गाजर, भोपळा, टोमॅटो, भोपळी मिरची, मका, शेवगा, वांगे, कोबी इत्यादी.

७. बिया आणि सुकामेवा

बिया आणि सुकामेवा हे निरोगी चरबी, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, फ्लेव्होनोइड्स आणि आहारातील फायबर ह्यांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. पहिल्या महिन्यामध्ये आणि आपल्या गर्भधारणेदरम्यान निरोगी बाळासाठी हे नियमितपणे खा.

८. मासे

कमी चरबी आणि उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचे, मासे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. मासे ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, जीवनसत्व ब, ड आणि ई, तसेच पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त, आयोडीन, मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस ह्यासारखी आवश्यक खनिजे इत्यादींचा स्त्रोत आहेत.

९. मांस

मांसामध्ये बी जीवनसत्त्वे, प्रथिने, जस्त आणि लोह असते. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यामध्ये आपण आपल्या आहारात कमी प्रमाणात मांस खाल्ल्यास हे आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी चांगले आहे. तथापि, डुकराचे मांस आणि कच्चे मांस खाणे टाळणे चांगले आहे.

गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात टाळावेत असे अन्नपदार्थ

गर्भधारणेच्या वेळी काही पदार्थ टाळले पाहिजेत कारण ते बाळाला हानी पोहोचवू शकतात.

१. मऊ चीझ

मऊ चीझ असंतृप्त दुधापासून बनवले जाते आणि त्यात जीवाणू असू शकतात. ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. म्हणून गर्भावस्थेच्या वेळी मऊ चीझ टाळणे चांगले.

२. पॅक आणि प्रक्रिया केलेले अन्न

पॅक आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जसे कि ज्यूस, मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून होणारे तयार जेवण, केक्स आणि बिस्किटे, इत्यादींमध्ये संरक्षक रसायने, साखर आणि सोडियमचे असलेले उच्च प्रमाण आपल्यासाठी किंवा आपल्या बाळासाठी चांगले नाही. काही पॅक केलेल्या अन्नामध्ये जीवाणू देखील असू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. नैसर्गिक किंवा सेंद्रिय उत्पादनांसह ताजे, घरगुती शिजवलेले जेवण तयार करा.

३. सी फूड

सी फूड मध्ये पारा उच्च प्रमाणात असतो. पारा गर्भाच्या मेंदूच्या नुकसानीस आणि विकासास होणाऱ्या विलंबास कारणीभूत असतो. म्हणूनच, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसात समुद्रातील मासे खाणे टाळा.

४. पपई

कच्च्या आणि अर्ध-पक्व पपईमध्ये लॅटेक्स असते, जे गर्भाशयाच्या संकुचित होण्यास कारणीभूत ठरते आणि गर्भपात होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान कच्ची पपई खाणे टाळा. तथापि पिकलेल्या पपईमध्ये, अनेक पोषकमूल्ये असतात आणि आपल्या डॉक्टरांनी परवानगी दिल्यास आपण थोड्या प्रमाणात पिकलेली पपई खाऊ शकता.

५. अननस

अननसांमध्ये ब्रोमेलेन नावाचा पदार्थ असतो जो गर्भाशयाला मऊ करू शकतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, गर्भाशयाच्या सौम्यतेमुळे गर्भपात किंवा निर्धारित तारखेच्या आधी प्रसूती होऊ शकते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान अननस टाळणे चांगले आहे.

६. कच्चे किंवा कमी शिजवलेले मांस

कच्चे किंवा कमी शिजवलेले मांस जीवाणू, सॅल्मोनेला, लिस्टरिया इत्यादीने दूषित असू शकतात. ज्यामुळे गंभीर रोग उद्भवू शकतात आणि गर्भाच्या विकासावर परिणाम करतात. डुकराचे मांस खाणे देखील टाळणे चांगले आहे कारण किंचित कमी शिजवलेल्या डुकराचे मांसामध्ये कीटकांची अंडी असतात, ज्यामुळे आईला संसर्ग होऊ शकतो त्यामुळे आई आणि बाळाला गंभीर आरोग्य नुकसान होऊ शकते.

७. जंक फूड

गर्भधारणेदरम्यान खूपच जंक फूड खाणे हे उदासीनता, चिंता यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांशी संबंधित आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की गर्भधारणेदरम्यान या प्रकारचे अन्न खाल्ल्याने, होणाऱ्या मुलांमध्ये लठ्ठपणा आढळतो.

८. कॅफिन

गर्भावस्थेच्या सुरुवातीला कॅफिनचे प्रमाण मर्यादित असले पाहिजे कारण ते मज्जासंस्थेला प्रभावित करते आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास अस्वस्थता, चिडचिडपणा, चिंता करणे वाढू शकते. ह्यामुळे गर्भपाताची शक्यता वाढते.

९. मादक पेय

विकसनशील गर्भासाठी अल्कोहोल खूपच वाईट आहे आणि गंभीर जन्म दोष होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान अल्कोहोल पूर्णपणे टाळा.

१०. गोड़ पदार्थ

गर्भवती स्त्रीला नवजात मुलाच्या वाढीस मदत करण्यासाठी अतिरिक्त ३०० कॅलरी आवश्यक आहेत. जास्त प्रमाणात गोड़ पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढते आणि गर्भधारणेदरम्यान मधुमेह होऊ शकते.

गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यातील आहाराविषयी काही सूचना

गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात आपल्या आहाराची योजना आखताना लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी येथे आहेत: गर्भधारणेचा पहिला महिना म्हणजे आपल्या शरीरात कित्येक बदल घडतात, उदा: हार्मोनल बदल, मानसिक स्थितीत होणारे बदल, थकवा आणि मॉर्निंग सिकनेस इत्यादी. निरोगी अन्न खाणे, नियमित अंतरांने थोडे खाणे, शरीराचे सजलीकरण राखणे, मध्यम व्यायाम करणे ह्या उपायांमुळे ही लक्षणे कमी होऊ शकतात. यामुळे आपल्या मुलाची निरोगी वाढ आणि चांगला विकास होईल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved